मुंबई- महाराष्ट्रात रेमडेसीवीर देण्याला केंद्राने बंदी घातली आहे, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात पुरावे द्यावेत, अन्यथा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार तथा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार कुपी विकण्याला नकार देत असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. राज्यसरकारने 16 निर्यातदार कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता, केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिला तर आमचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे, असे नवाब मलिक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.