महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंमली पदार्थविरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे 'राष्ट्रवादी'चे प्रयत्न - भाजप

अतिवृष्टीमुळे हतबल झालेले मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. याखेरीजही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने बोलणे अपेक्षित आहे.

keshav upadhyay
केशव उपाध्याय

By

Published : Oct 20, 2021, 3:06 AM IST

मुंबई - अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे सांगत मलिकांची री ओढत आहेत. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून अंमली पदार्थ विरोधात सुरु असलेल्या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

...म्हणून राष्ट्रवादी पत्रकार परिषदा घेतंय -

अतिवृष्टीमुळे हतबल झालेले मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. याखेरीजही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने बोलणे अपेक्षित आहे. मात्र, मलिक हे आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली, अंमली पदार्थ सापडले नाहीत यासारखी सफाई देण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत. आपल्या जावयाचे केविलवाणे समर्थन करणाऱ्या मलिक यांना राज्यापुढे अन्य महत्त्वाचे प्रश्नच नाहीत, असे वाटत असावे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तंबाखू, गुटखा वगैरे पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव असताना तेही मलिक यांचीच री ओढत आहेत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

हेही वाचा -महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ..! सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा; लोंढेंच्या बढतीमुळे सावंत नाराज?

अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना अंमली पदार्थविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्याची गरज आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अंमली पदार्थविरोधी मोहिमेत अडथळे आणण्याचाच हा प्रयत्न आहे, असेही उपाध्ये यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details