मुंबई :मोहसीन अब्दुल कादिर सालेमन आणि अलेशिष एन्जेला फर्नाडिस नावाचे दोन प्रवाशी, आबूधाबी येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी त्यांचे पोर्तुगीज पासपोर्ट, पोर्तुगीज देशाचे सिटीझनशीप कार्ड आणि बोर्डिंग पासेससह इतर दस्तावेज दाखविले होते. ते दोघेही आबूधाबी येथून आयर्लंड येथे जाणार होते. या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर मोहसीन सालेमन या व्यक्तीला लुक आऊट नोटीसवर ठेवण्यात आल्याचे इमिग्रेशन अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
कार्ड देण्याचे दिले आश्वासन : चौकशीअंती त्यांचे खरे नाव मालदेवभाई मोघवाडिया आणि हिरल मोघवाडिया असल्याचे उघडकीस आले. २०१८ साली ते दोघेही लंडन येथे गेले होते. तिथे त्यांनी काही महिने काम केल्यानंतर ते एका गुजराती एजंटच्या संपर्कात आले होते. या एजंटने त्यांना २५ हजार ब्रिटीश पौंडच्या बदल्यात पोर्तुगीज देशाचा पासपोर्ट व सिटीझनशीप कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याच्यासोबत ते दोघेही लिस्बन येथे गेले होते. तिथे त्याने या दोघांचे दोन वेगवेगळ्या नावाचे बोगस पासपोर्ट बनविले. याच पासपोर्टवर त्यांनी दोन वेळा भारत-पोर्तुगीज आणि पुन्हा भारतात प्रवास केला होता.