मुंबई-एकतर्फी प्रेमातून अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरात मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी योगेश कुमार महिपाल सिंग हा वसईमध्ये पळून गेलेला होता. या दरम्यान त्याच्या वाहनाला अपघात झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर योगेश कुमारला अटक करण्यात आली. या आरोपीची रवानगी 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिची 2019 मध्ये फेसबुकवर योगेश कुमार महिपाल सिंग यांच्यासोबत ओळख झाली होती. योगेशने स्वत:ची ओळख चित्रपट निर्माता म्हणून दाखवली होती. या नंतर दोघांमध्ये मैत्री वाढली होती. बऱ्याच वेळा एकमेकांना भेटल्यानंतर योगेश कुमार महिपाल सिंग याने अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिला प्रेम संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. मात्र या गोष्टीला मालवी मल्होत्रा हिने वेळोवेळी नकार दिल्याचे तिने म्हटले आहे. मात्र या गोष्टीचा राग मनात धरून अचानक त्याने वर्सोवातील फिशरीज रोडवरून मालवी एकटी जात असताना तिचा रस्ता अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिला कोकीलाबेन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.