मुंबई -कोरोना नियंत्रणात येत असतानाच कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'म्युूकरमायकोसिस' आजार होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱ्या या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका असतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार होणे गरजेचे असते. मुंबईत सद्यस्थितीत 'म्युकर मायकोसिस'चे 111 रुग्ण पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये या रुग्णांचे निदान झाल्यानंतर तातडीने आवश्यक उपचार केल्यामुळे सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचारही सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
रुग्णांना मोफत उपचार -
'म्यूकरमायकोसिस'वर इंजेक्शन एम्पफोरिसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी पालिकेने 1 लाख 89 हजार एम्पह्टेरिसिन-बी लॅपोझोम इंजेक्शन आणि आणि टॅबलेट पोसोकोनेझोल 38 हजार इतक्या प्रमाणात मागवल्या आहेत. यासाठी पालिकेने निविदाही काढल्या आहेत. पाच ते दहा हजारांपर्यंत किंमत असणारी महागडी इंजेक्शन, गोळ्या पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांना मोफत दिली जाणार आहेत.