मुंबई Atal Setu Inauguration :आज (12 जानेवारी) देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू आणि महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित न्हावाशेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मात्र, या उद्घाटनावरुन आता मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय. या कार्यक्रमासाठी ऐनवेळी निमंत्रण मिळल्यानं ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली असून, या लोकार्पण सोहळ्यावर शिवसेना (ठाकरे गटाने) बहिष्कार टाकला आहे.
ऐनवेळी निमंत्रण दिल्याने नाराजी : मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. तसंच कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, या लोकार्पण सोहळ्यासाठी कालपर्यंत ( 11 जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. ठाकरे गटाला आज सकाळी ऐनवेळी या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. मतदारसंघातील आणि स्थानिक आमदार, खासदार यांना एक दिवस अगोदर निमंत्रण येणं अपेक्षित होते. पण ऐनवेळी निमंत्रण मिळल्यानं ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली असून, या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळं उद्घाटनापूर्वीच मानापमान नाट्य बघायला मिळत आहे.