मुंबई - मुंबईतील महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या अशा जे जे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सोमवारपासून (18 मे) कोलमडण्याची शक्यता आहे. कारण सोमवारपासून जे जे रूग्णालयातील मधील 900 चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. चतुर्थ श्रेणी वर्गात कंत्राटी पदभरती करू नये आणि सरळ सेवा भरती करत कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. याची माहिती जे जे रूग्णालयातील राज्य शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली आहे.
कर्मचारी भरतीस विरोध
'कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणामधील मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी पध्दतीने कामगार भरती करण्यात आली आहे; शिवाय भरती केलीही जात आहे. पण जे जे रूग्णालयात कंत्राटी पध्दतीला जोरदार विरोध करण्यात आला आहे. त्याचवेळी येथील चतुर्थ श्रेणी कामगारांची रिक्त पदे सरळ सेवा पध्दतीनेच भरा. त्यातही आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्या, अशी मागणी आमची आहे', असे राणे यांनी म्हटले आहे.
'या मागणीसाठी आम्ही सर्व स्तरावर पाठपुरावा करत आहोत. काही दिवसांपूर्वी वरिष्ठांनी एक बैठक घेत याबाबत ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. पण पुढे काहीच केले नाही. त्यामुळे आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे', असेही त्यांनी सांगितले आहे.