प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ते आणि राजकीय विश्लेषक मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात अतिशय नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादीमधील एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा वर्णी लागली.
विरोधी पक्षनेत्याविना कामकाज -अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात संख्याबळ जास्त असलेला पक्ष म्हणून काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करेल, अशी अपेक्षा असताना काँग्रेसने नेहमीप्रमाणे आस्ते कदम भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपापला प्रतोद नेमला असला तरी या प्रतोदांकडून आपापल्या आमदारांना विधानसभेत हजर राहण्याबाबत व्हीप मात्र बजावण्यात आलेला नाही. या मागचे नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत आम्ही काँग्रेसच्या नेत्यांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
संख्याबळाच्या दृष्टीने आमचे वजन विधानसभेत आणि विधान परिषदेत जास्ता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील निर्णय गे मेरिटवर घेतले जातात. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता निडवला जाईल, तसेच सध्याही काँग्रेस दोन्ही सभागृहात आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. - काका कुलकर्णी, प्रवक्ते, काँग्रेस
काँग्रेसची भूमिका -विधानसभेचा पहिला आठवडा हा विरोधी पक्षाने गाजवला, विरोधी पक्षाने म्हणताना काँग्रेसने गाजवला असे म्हणता येईल. काँग्रेसचे सभागृहातील नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण या सर्वांनी सत्ताधाऱ्यांवर विविध प्रश्नांसाठी तुटून पडण्याचा कार्यक्रम केला. तसेच जनतेच्या प्रश्नांना न्याय देताना अतिशय आक्रमकपणे आपली बाजू मांडली. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाची बाजू कुठे कमी पडली किंवा विरोधी पक्ष नेत्याचे काम झाले नाही असे दिसत नाही. काँग्रेसचे आमचे सर्व नेते आपली बाजू भक्कमपणे मांडत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी यांनी दिली आहे.
सोमवारपर्यंत होणार काँग्रेसचा विरोधी पक्षनेता - मेरिटवर सर्वकाही झाले पाहिजे अशी भूमिका महाविकास आघाडी म्हणून सर्वांची आहे. त्यामुळे मेरिटवर काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ आणि विधान परिषदेतील संख्याबळ दोन्ही जास्त आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार, असा दावा काका कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्यांची नेमणूक निश्चित केली जाईल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीमधील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत निश्चितच विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेता पदासाठी विधानसभा अध्यक्षांकडे काँग्रेसने आतापर्यंत नेत्याचे नाव देणे अपेक्षित होते. मात्र, आपल्या पक्षातला विरोधी पक्षनेता कोण असणार हेच अजून काँग्रेसला ठरवता आले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अजूनपर्यंत व्हीज बजावलेला नाही - अनिकेत जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
अधिवेशन अनेक प्रश्न निर्माण करणारे - पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आठवडा उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली नाहीत. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेता पद सोडून उपमुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर विरोधी पक्षनेता कोण? या प्रश्नाचे उत्तर खरंतर विधानसभेच्या पहिल्या दिवशीच मिळणे अपेक्षित होते. पण ते आज आठवडा संपल्यानंतरही मिळालेले नाही. कारण काँग्रेसला आपला विरोधी पक्षनेता कोण असावा हेच ठरवता आलेले नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेता कोण हे काँग्रेसला ठरवता आले नाही - आता काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा जो गटनेता असेल त्यांच्याकडे ही जबाबदारी आली पाहिजे, परंतु ती अद्याप आलेली नाही, कारण काँग्रेसने तसा दावा अध्यक्षांकडे केलेला नाही, त्यामुळे ही एक फार मोठी आश्चर्यकारक आणि त्याचबरोबर विधिमंडळाच्या परंपरेला न शोभणारे अशा प्रकारची ही घटना आहे ती योग्य नाही, असेही जोशी म्हणाले. काँग्रेस हे विधानसभा अध्यक्षांकडे ज्या नेत्याचे नाव देतील त्यांची निवड अध्यक्ष लगेच करतील. विरोधी पक्षनेत्याला राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांचा अधिकार असतो. अनेक सुविधा विरोधी पक्ष नेत्यांना मिळतील. तो महाराष्ट्रभर कुठेही फिरू शकतो आणि लोकांच्या प्रश्नात लक्ष घालू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचे असे पद आहे. त्यामुळे ते रिक्त असता कामा नये, असेही जोशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संभ्रम - राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली. त्यानंतर एक मोठा गट सरकारसोबत गेल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. मात्र, विरोधी पक्षांमध्ये जो गट आहे तो गट कितपत कार्यरत आहे हा प्रश्न आहे. तो गट कार्यरत नाही असे आपल्याला नमूद करावे लागते .पहिल्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेला राष्ट्रवादीचा गट या आंदोलनात सहभागी झालेला दिसून आला नाही. दोन्ही गटांनी आपले नवीन प्रतोद जाहीर केले आहेत. तसेच आमचाच व्हीप लागू होईल असेही दोन्हीकडून सांगण्यात आले होते. मात्र, दोन्ही गटांच्या प्रतोदांनी आपल्या आमदारांना हजर राहा आणि मतदान करा अशा प्रकारचा व्हीप द्यायचा असतो तो दिला नाही. त्याचे कारण म्हणजे शरद पवार गट किंवा अजित पवार गट हे आमदारांच्या संख्येबाबत अजून चाचपडत आहेत. त्यांना व्हीप बजावून जोखीम पत्कारायची नाही, असे जोशी यांनी सांगितले. त्यामुळे कुणाचा व्हीप चालणार, कुणाचा चालणार नाही. ही गोष्ट संदीग्ध अशा प्रकारची राहिलेली आहे.
हेही वाचा -
- CM Eknath Shinde Met PM Narendra Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 'या' विषयांवर चर्चा
- Sanjay Raut Attack On Pm : 'मन की बात नही मणिपूर की बात करो' खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
- Ajit pawar Birthday : साखर कारखान्याचा संचालक ते उपमुख्यमंत्री अजित दादांचा प्रवास