मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीतील जागावाटपाचा 90 टक्के विषय आज (मंगळवारी) मार्गी लावण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून याविषयीचा ठोस निर्णय घेण्यात आला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या राज्यातल्या आणि मुंबईतल्या ९० टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला आहे.
हेही वाचा - आखाडा विधानसभेचा : खामगाव विधानसभेसाठी होणार तिरंगी लढत; वंबआची भूमिका ठरणार परिणामकारक
राज्यात मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते आमदार, माजी आमदार हे सेना-भाजप मध्ये जात आहेत. त्यासाठी जागा वाटप आणि उमेदवार लवकर निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षाचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली होती. ती बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शरद रणपिसे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार नसीम खान, राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड, संजय खोडके, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.