महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अश्विनी भिडे, संजीव जयस्‍वाल यांनी स्‍वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाचा पदभार - Mumbai municipal corporation

मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, जयश्री भोज यांची राज्य सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्‍वाल यांची राज्‍य शासनाने नियुक्ती केली असून भिडे आणि जयस्‍वाल यांनी आज पदभार स्वीकारला.

edited photo
संपादित छायाचित्र

By

Published : May 9, 2020, 6:04 PM IST

मुंबई- मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, जयश्री भोज यांची राज्य सरकारने बदली केली आहे. त्यांच्या जागी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्‍वाल यांची राज्‍य शासनाने नियुक्ती केली असून भिडे आणि जयस्‍वाल यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी सहआयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) मिलिन सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने त्‍यांचे स्‍वागत केले.

कोण आहेत अश्विनी भिडे..?

अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील 1995 च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेतील 24 वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या विभागीय अतिरिक्‍त आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम. एम. आर. डी. ए.) अतिरिक्‍त आयुक्‍तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव म्‍हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे.

त्‍याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून त्‍यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्‍याच्‍यादृष्‍टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्‍या निर्मितीत महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे.

कोण आहेत संजीव जयस्‍वाल..?

संजीव जयस्‍वाल हे भारतीय सनदी सेवेतील 1996 च्‍या तुकडीचे अधिकारी असून त्‍यांनीही आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक व तळोजा (जि. नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उपमुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्‍हणून जयस्‍वाल यांनी काम पाहिले आहे. त्‍यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.

हेही वाचा -धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; मात्र, धोका टळलेला नाही

ABOUT THE AUTHOR

...view details