मुंबई -मंत्रालयातील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुरू केलेल्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद मिळाला. मंत्रालयातील विविध विभागाच्या निवेदनासोबत मुंबईसह राज्यातील विविध महापालिकेतील प्रश्नांचे निवेदनही या लोक दरबारात नागरिकांनी सादर केले. विशेष म्हणजे महापालिका हा विषय आपल्या अखत्यारीत येत नसला तरी आपण त्यासाठीचा पाठपुरावा करू, असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी नागरिकांना दिले. त्यामुळे अनेकांना त्याचा दिलासा मिळण्याचे चित्र यावेळी पाहायवयास मिळाले.
अशोक चव्हाण यांच्या पहिल्याच ‘लोकदरबार’मध्ये एकूण ९० निवेदने आली आहेत. त्यात सर्वाधिक निवेदनही महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाचे असून त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे असल्याचे दिसून आले. या दरबारात आलेल्या निवेदनाची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. या लोकदरबारात प्रामुख्याने महसूल, कृषी आणि ग्रामविकास यातील प्रश्न आपल्या निवेदनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी मांडले. त्यांना दाद द्यावी, अशी विनंती अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
हेही वाचा -बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी मतदानापासून राहणार वंचित