मुंबई - काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना आज मुंबईतील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. कुलाबा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे प्रदेश काँग्रेस कार्यालयातील आयोजित लोकदरबार कार्यक्रमाला पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे हा अप्रत्यक्ष मुंबई महापालिकेला टोला आहे की, काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हेही वाचा -'महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत'
'कुलाबा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे आज मला प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित लोकदरबार कार्यक्रमाला जाण्यास उशीर झाला. अखेर काही अंतरावर गाडी सोडून मी पायी चालतच गांधी भवन गाठले.', असे ट्विट करून त्यांनी त्याखाली चालत कार्यालयात पोहोचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेवर विरोधकांनी टीका केली होती. "महाआघाडीच्या सरकारचे काम राज्यघटनेच्या चौकटीतच होईल, असे शिवसेनेकडून लेखी घेतले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच तसे आदेश दिले होते", असे अशोक चव्हाण म्हणाले होते. आजच्या त्यांच्या ट्विटवरूनही भाजपसह विरोधक शिवसेनेला मुंबईतील वाहतूक कोंडीवरून लक्ष्य करण्याची चर्चा मुंबई परिसरात आहे.
हेही वाचा -'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे'