मुंबई: टोकाच्या संघर्षानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यात प्रभारी एच. के. पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची आज टिळक भवन येथे बैठक पार पडली. दरम्यान पटोले यांना थोरात यांच्या पत्राबाबत प्रसारमाध्यमांनी छेडले असता, पटोले यांनी पत्र दिले नसल्याचे सांगत सगळे आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच, तुम्हीच पत्र दाखवा, असा प्रतिप्रश्न केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नाना पटोले यांच्या मदतीला धावून आले. पटोले यांनी, थोरात यांचे पत्रच पाहिलेच नाही असे सांगत, सगळे दावेप्रति दावे खोडून काढले. यामुळे एकच हास्यकल्लोळ उडाला.
कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद : शिक्षक, पदवीधर निवडणुकी दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी उडाली. नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्याने हा चिघळला. सत्यजित तांबे यांनी निवडणुकीनंतर नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेब थोरात यांच्या हाताला दुखापत झाल्याने ते या निवडणुकीपासून लांब राहिले होते. निवडणूक संपल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना थोरात यांनी पत्रव्यवहार करत, पटोले यांच्यासोबत काम करणार नाही, असे नमूद केले होते.
कॉंग्रेसची मुंबईत बैठक : काँग्रेसच्या पडत्या काळात, बाळासाहेब थोरात यांनी पक्ष वाढवण्याचा इंद्रधनुष्य पेलला होता. मात्र, थोरात यांच्या पत्रामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. पक्षश्रेष्ठीना याची दखल घ्यावी लागली. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईत येऊन थोरात आणि पटोले यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या आज झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत पटोले आणि थोरात एकाच मंचावर आल्याने दोघांमध्ये मनोमिलन घडून आणण्यात पाटील यशस्वी झाल्याचे बोलले गेले. आजची बैठक हसत्या - खेळत्या वातावरणात पार पडली. दोघांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.