मुंबईAshok Chavan On Maratha Movement :जालना येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यारून उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी काल लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण लागले. राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. (suppress Maratha movement) अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते अंतरवली सराटी गावात जाऊन आंदोलकांच्या भेटी घेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे, शासनाने कार्यक्रमासाठी मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Shashan Aaplya Dari Program)
आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू :राज्य सरकारच्या वतीने सध्या राज्यभर शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. 8 सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी जालना जिल्ह्यात होणार आहे. अंतरवली सराटी मराठा आंदोलनाचा फटका शासन आपल्या दारी कार्यक्रमाला बसू नये म्हणून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते. पोलिसांकडून लाठीहल्ला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून रबरी बुलेटचा देखील वापर करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलकांनी काहीतरी केलं म्हणूनच लाठीहल्ला केल्याची भूमिका राज्य सरकार घेऊ पाहत आहे. तसंच या आंदोलनाला हिंसक वळण देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न देखील काही मंडळींनी सुरू केला आहे.