मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ जुलैपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची त्यांच्या मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले आहेत की, अधिवेशनापूर्वी आम्हाला सर्वांना एकत्र तयारी करायची आहे. आजच्या बैठकीत अधिवेशनाचा अजेंडा काय असावा याबाबत चर्चा झाली. आम्हाला महाविकास आघाडीची अधिवेशनापूर्वी महत्त्वाची बैठक घ्यायची आहे. त्याबाबतही चर्चा झाली. शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर कोर्टाची कारवाई सुरू आहे. त्या कारणाने त्यांचे नेते येऊ शकले नाहीत. पण लवकरात लवकर महाविकास आघाडीची या संदर्भात बैठक होणार आहे.
अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार :लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकीत काँग्रेसमध्ये काय चर्चा झाली, याची एकंदरीत माहिती अजित पवार यांना दिली आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. या संदर्भामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे उपस्थित असतील, तेव्हा याबाबत चर्चा होईल. लोकसभेचे जागा वाटप पूर्णतः मेरिट नुसार केले जाणार आहे. विशेष करून भाजपकडे असलेल्या लोकसभेच्या २३ जागांमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? राजकीय समीकरणे काय असू शकतात. याबाबत आढावा घेतल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.