मुंबई Ashok Chavan: राज्यात मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी रान उठवलं आहे. मागील महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी पंधरा दिवसांच्यावर अंतरवाली सराटी, जालना येथे उपोषण केलं होतं. यावेळी याची दखल सरकार घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी दाखल होते, आरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले होते. यावेळी त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली होती. सध्या मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभर दौर सुरु आहेत. आम्हाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे आरक्षणाचा सरकारने निर्णय न घेतल्यास बुधवारी (२५ ऑक्टोबर) या दिवशी आंदोलनाची पुढची दिशा व भूमिका ठरवण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला असताना, राज्य सरकारने मराठा आरक्षणावरुन रविवारी आणि आज वृत्तपत्रातून वेगवेगळ्या जाहिरात (Advertisement About Maratha Reservation) दिल्या आहेत. या जाहिरातीवरुन सरकारवर टीका केली जात आहे.
रविवारच्या आणि आजच्या जाहिरातीत काय? : राज्य सरकारने रविवारी अनेक वृत्तपत्रातून मराठा आरक्षणाबाबत जाहिरात दिल्या. या जाहिरातीत मराठा समाजाला आपण आरक्षण दिल्याचा दावा सरकारने केला आहे. सर्वोच्य न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, EWS करिता १० टक्के आरक्षणावर मोहर उमटवली. EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ, असं रविवारच्या जाहिरातीतून म्हटलं आहे. तर आजच्या जाहिरातीतून "धोरण आखले आहे तोरण बांधण्याचे, मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे" पुनश्च मराठा समाजाचे हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे", असं सरकारने दिलेल्या आजच्या जाहिरातीतून म्हटलं आहे. दरम्यान, सरकारच्या या दोन वेगवेगळ्या जाहिरातीतून घूमजाव केल्यामुळं विरोधकांनी तसेच मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.