मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतूक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ यावी, हा प्रकार भाजप सरकारसाठी लज्जास्पद असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता चव्हाट्यावर आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे सोमवारी अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते. या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, त्या सहा शेतकऱ्यांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रक्कमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवायलाही पैसे नसायचे. त्या काळात मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे खुद्द पंतप्रधानांनीच ‘मन की बात’मधून जाहीर कौतूक केले होते.
मोदींनी प्रशंसोद्गार काढलेले राऊत यांच्या मालकीच्या ‘मराठा’ हॉटेलची जागा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झाली. त्या जागेला अतिशय अल्प मोबदला मिळाल्याने मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. हीच तक्रार घेऊन इतरही अनेक शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे दाद मागत होते. त्यामध्ये २०१७ मध्ये आत्महत्या करणारे शेतकरी भारत टकले यांची पत्नी अर्चना टकले यांचाही समावेश होता. त्यांनीही काल सरकारच्या अनास्थेला कंटाळून विष प्राशन केले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याशी लागेबांधे असलेल्या लोकांना घसघशीत मोबदला दिला जात असताना इतरांना तुटपुंजा मोबदला का? असा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता.