मुंबई - सोनिया गांधीचे दूरदर्शी आणि कणखर नेतृत्व काँग्रेसला पुन्हा संजीवनी देईल, याचा मला पूर्ण विश्वास असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले. १९९८ मध्येही अत्यंत खडतर परिस्थितीतून सोनिया गांधींनी काँग्रेसला सावरले होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल, असे चव्हाण म्हणाले.
शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली. यावेळी राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर शनिवारी सोनिया गांधींची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले.