मुंबई : हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मिडियात ध्वनी प्रदूषण करीत होते असा चिमटा काढला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी ट्विट करून संजय राऊत तसेच ठाकरे गटावर टीका केली आहे. उद्धवसेनेच्या नेत्यांनी कोणत्या यात्रेत सहभागी व्हायचे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस सोबत संघर्ष केला. एवढेच नव्हे तर काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर पक्ष बंद करीन. मात्र काँग्रेस सोबत जाणार नाही हा बाळासाहेबांचा ठाम निर्धार होता, अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
पाक व्याप्त काश्मीर मुद्द्यावरून डिवचले : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे गुरूवारी सायंकाळी जम्मू काश्मीर येथे पोहोचले होते. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच संजय राऊत असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्याकडून या यात्रेचे समर्थनच करण्यात आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांची यात्रा पोहोचल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले होते. जम्मू कश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला पाक व्याप्त काश्मीर मुद्द्यावरून डिवचले आहे.