मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक झाली आहे. आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे पिता-पुत्र म्हणजे आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्र आहेत, असे शेलार म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मंदिरे सुरू करण्याची मागणी होत आहे. भाजपा, एमआयएम, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह धार्मिक संघटनांनी ही मागणी केली आहे. राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंदिरे उघडण्याची मागणी केली. मात्र, सरकारने त्यावर काहीही निर्णय घेतला नाही, त्यामुळे भाजपा नेते संतप्त झाले आहेत.
'आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट ऐका, महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले. शेती, घरे, गुरे सारे काही उद्ध्वस्त. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर. तेव्हा नगराचे राजे 'बॉलिवूड' कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले आहेत', असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी, उघडा असा आर्जव करत आहे. त्याचवेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना. पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30पर्यंत खुले ठेवून 'नाईटलाइफ'ची काळजी 'राजपुत्र' करत आहेत. असे दुर्दैवी चित्र आहे. 'महाराष्ट्र' नगरी आणि चौपट राजा! असे, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलार यांनी टीका केली आहे.