मुंबई Ashish Shelar On Uddhav Thackeray : मकर संक्रांतीच्या दिनी देशभर भाजपाकडून 'पतंग उत्सव' साजरा करण्यात येत आहे. (Makar Sankrant 2024) मुंबईतसुद्धा मरीन ड्राईव्ह येथे भाजपाकडून पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी बोलताना भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या 'महापत्रकार परिषदे'वरुन जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची मंगळवारी 'महापत्रकार परिषद' होणार आहे. या पत्रकार परिषदेतून अनेक गौप्यस्फोट केले जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.
जगभरामध्ये भारताचे नाव व्हावे :याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आज मकरसंक्रात आहे. त्याबरोबर गोड बोलण्याचा संकल्प असून ५५० वर्षाच्या संघर्षानंतर आमचे रामलल्ला हे अयोध्येत राम मंदिरात स्थापन होत आहेत. हा आनंदाचा क्षण अनोख्या पद्धतीने अनुभवण्यासाठी भाजपाकडून पतंग उत्सव साजरा करत आहोत. पतंगावर प्रभू रामचंद्रांचे चित्र आणि त्यांची मनोकामना असून हा पतंग उंचच उंच आकाशात उडवून जगभरामध्ये भारताचे नाव व्हावे या भावनेने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
राम मंदिराची चेष्ठा राऊतांनी केली :राम मंदिरा बाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, संजय राऊत कारसेवेला होते का? शिलान्यासला होते का? राऊतांना सार्वजनिक ठिकाणी उभं करून त्यांची अदालत घ्यायला हवी. राम मंदिराच्या वर्गणीवर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याप्रकारे राम मंदिराची चेष्ठा राऊतांनी केली आहे. राऊत रामभक्तांचे पापी असून त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही. राम मंदिर आंदोलनाच्या वेळेला संजय राऊत यांनी जे लिखाण केले त्याची पुस्तिकासुद्धा उपलब्ध आहे. संजय राऊत यांच्याकडे संपादक पद तरी पूर्णपणे आहे का? की कोणी वहिनी त्यांच्या डोक्यावर बसल्या आहेत, याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच संजय राऊत यांनी अगोदर मालवणात जाऊन यावं मग मणिपूर बाबत बोलावं, असेही शेलार म्हणाले.