मुंबई -आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. मात्र, फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला, काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता, असा पलटवार भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
काँग्रेसचे पितळ उघडे केले-
आरेची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती. असा आरोप करून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अज्ञानाचे पुन्हा एकदा प्रदर्शन करत अतिशहाणपणाचा भाग-2 सादर केला आहे. त्याचा कागदोपत्री पुरावा सादर करुन भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत काँग्रेसचे पितळ उघडे पाडले.
'आरेतील भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला होता'
काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता, असा पलटवार भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
काँग्रेसला हा भूखंड खाण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री मदत करणार का-
सावंत यांनी आता हे सारे बोलून महाराष्ट्राचे विद्यामान मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना पण संशयाच्या भोवऱ्यात आणले आहे. कारशेड स्थलांतर करुन आरेतील जागेचा वापर अन्य गोष्टींसाठी करणार, असे सांगणारे विद्यमान मुख्यमंत्री, या जागेचा वापर नेमका कशासाठी करणार, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. सत्तेतील पार्टनर असलेल्या काँग्रेसला हा भूखंड खाण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री मदत करणार का, असा सवाल ही आता या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे या जागेचा वापर व्यवसायिक होणार नाही, असे वचन मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे, असेही आशिष शेलार यांनी म्हटले. सचिन सावंत हे रोज अशाच प्रकारे बोलत राहिले, तर अजून बरेच बाहेर येईल, त्यामुळे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, असा टोला ही आमदार आशिष शेलार यांनी लगावला.
1000 कोटी रूपये आरेच्या जागेतून उभे करण्याचा काँग्रेस सरकारचा प्रयत्न
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात 3 मार्च 2014 रोजी नगरविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक एमआरडी-3311/प्र.क्र. 149/नवि-7 जारी केला. हा शासन आदेशानुसार आरेलगतची 3 हेक्टर जागा ही प्रकल्पाच्या निधी उभारण्यासाठी त्याचा व्यावसायिक वापर करण्याकरण्याकरीता एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात यावी. सुमारे 1000 कोटी रूपये यातून उभे करण्याचा काँग्रेस सरकारचा प्रयत्न होता. पण, भाजपा सरकारने हा प्रयत्न हाणून पााडला, असे असताना सचिन सावंत हे आरोप का करीत आहेत, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.
सत्य उघड करण्याची संधी देणाऱ्या सावंतांचे आभार
देवेंद्र फडणवीस सरकारने जेव्हा सर्व जागांचे पर्याय पडताळून पाहिले आणि आरेचीच जागा योग्य असल्याचा निष्कर्ष काढला, तेव्हा त्याची अधिसूचना काढताना आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर होणार नाही, असे अंतिम अधिसूचनेत स्पष्टपणे अधोरेखित केले. या 9 नोव्हेंबर 2017 च्या अंतिम अधिसूचनेतील संबंधित विषयाचे छायाचित्र सुद्धा सोबत जोडले भाजपने जोडले होते. सर्व बाबी अतिशय स्पष्ट आहेत. त्यामुळे आम्हाला रोज सत्य उघड करण्याची संधी देणाऱ्या सावंतांचे आभार, असेही शेलार यांनी टीका करत म्हटले आहे.
भाजप मुंबईकरांची दिशाभूल करते आहे-
भाजप आणि फडणवीस सरकारने मेट्रोच्या आरे कार डेपो संदर्भात मंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटे बोलत राहीले, तो प्रकार भयंकर आणि अत्यंत घृणास्पद आहे. मेट्रोचा कारशेड कांजूरमार्गला करण्याचा प्लान फडणवीस सरकारचाच होता. ही जागा राज्य सरकारचीच असून त्या जागेवरून कोणताही वाद असण्याचे कारण नाही व तो कधीच नव्हता भाजपने मुंबईकरांची दिशाभूल करून त्यांचा विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.