मुंबई - आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर गाठले होते. या प्रवासावरती मनसेने टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशीच गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे अशी प्रार्थना विठ्ठलाकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचे ट्विट संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केली टीका -
हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले. तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग... पांडुरंग.. असे ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न -
मुंबईमध्ये खराब झालेल्या हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला पोहचले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षीही त्यानी स्वतः गाडी चालवून पंढरपुर गाठले होते. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. आज त्यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
आठ तासांच्या प्रवासानंतर लगेच घेतली बैठक -
आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून वाहनाने पंढरपुरात दाखल झाले. ८ तासांचा प्रवास, त्यातही मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले. लांबचा प्रवास असूनही मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे पोहचताच बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.