मुंबई :आशाताईंना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी गायली आहेत. गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी कला आणि संस्कृती क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासनातर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना 2021 साली हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 2021 साली जाहीर झालेला पुरस्कार शुक्रवारी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे.
असा आहे संगीताचा प्रवास: आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या मुख्य उपस्थितीत महाराष्ट्र भुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मागील आठ दशकांपासून मंगेशकर कुटुंब आपल्या संगीत आणि गाण्यांच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देश आणि जगाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आशा भोसले देखील याच मंगेशकर कुटुंबातील आहेत. आशा भोसले यांनी गायलेली अनेक गाणी आजही ऐकली जातात.