मुंबई- भायखळा विधानसभा मतदार संघात आमदारांनी काही केले नसल्याचे समजून आल्याने सर्व धर्मीय यामिनी जाधव यांच्या प्रचारात झाडून उतरले आहेत. यामुळे आता मतदारांनी वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवून भायखळ्याचे पार्सल म्हणजेच यामिनी जाधव यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन करत वारीस पठाण यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी टीका केली.
भायखळा विधानसभा मतदार संघामधून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी बोलताना मतदारांनी तिसरा डोळा उघडून सर्व विरोधी उमेदवारांना घरी बसवावे, असे आवाहन सावंत यांनी केले.
मुंबई महापालिका निवडणुकीत यशवंत जाधव व यामिनी जाधव दोघांनी निवडणूक लढवली. त्यात यामिनी जाधव यांचा पराभव झाला. मात्र, यामिनी जाधव या सध्या विधानसभा निवडणूक लढवत आहेत. काल आमच्या सोबत नसलेले मनोज जामसुतकर आमच्या सोबत आहेत. यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे सावंत म्हणाले.