मुंबई- कोरोनापासून प्रवाशांचे आणि रेल्वे कर्मचार्यांचे संरक्षण व सुरक्षा करण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेने विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने पुणे येथे आज तपासणी व देखरेखीची गती वाढवण्यासाठी कॅप्टन "अर्जून" हे रोबोट दाखल केले. प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी तसेच असामाजिक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी अर्जुनला आज लाँच केले गेले.
रेल्वे बोर्डातील आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांच्या हस्ते आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुख्य सुरक्षा अतुल पाठक, आयुक्त रेणू शर्मा यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी रोबोटिक कॅप्टन "अर्जून"ला ऑनलाईन लाँच केले. यावेळी संजीव मित्तल, जनरल मॅनेजर यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नाविन्याची प्रशंसा केली. रोबोटिक कॅप्टन अर्जून प्रवाशांना आणि कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण देईल आणि त्याच्या देखरेखीमुळे वाढीव सुरक्षा मिळेल, असे मित्तल यांनी यावेळी म्हटले. कॅप्टन अर्जून हा मोशन सेन्सर, एक पीटीझेड कॅमेरा (पॅन, टिल्ट, झूम कॅमेरा) आणि एक डोम कॅमेराने सुसज्ज असा आहे.