मुंबई- डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. यावेळी जाधव यांनी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांचे नाव घेतल्याने काँग्रेसने याला विरोध केला. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
मुंबईच्या डोंगरी येथील केसरबाई इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
यावर बोलताना जाधव म्हणाले, बी, सी, डी आणि ई विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. डोंगरी येथील केसरबाई इमारतीच्या दुर्घटनेला तसेच तेथील अनधिकृत बांधकामांना या विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभाग, लायसन्स विभाग यामधील अधिकारी जाबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.