मुंबई :पन्नास लाखांवर दरमाह एक लाख रुपयांचे आकर्षक व्याजदराचे गाजर दाखवून एका आर्किटेक व्यावसायिकाची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी मित्रासह दोघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. इर्शाद अहमद अन्सारी, फहीम हसन सिद्धीकी अशी या दोन ठगांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्यवसायीकला गुंतवणुकीचा सल्ला :जोगेश्वरी येथे राहणारे तक्रारदार व्यवसायाने आर्किटेक आहेत. त्यांचे कांदिवली परिसरात एक खाजगी कार्यालय आहे. फहीम हा त्यांच्या परिचित असून चार वर्षांपूर्वी तो त्यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने त्याचा स्वतचा व्यवसाय सुरु असून या व्यवसायात त्याचा इर्शाद हा पार्टनर आहे असे सांगितले होते. त्यांची कंपनी शूटींगसाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे काम करते. त्यात त्यांना प्रचंड फायदा झाल्याचे सांगून त्याने व्यवसायीकला गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.
दरमाह एक लाख रुपयांचे व्याज :किमान ५० लाखांची गुंतवणुक केल्यास त्यांना दरमाह एक लाख रुपयांचे व्याज मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. ही ऑफर चांगली असल्याने त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला. या करारानंतर त्यांनी कंपनीत ५० लाखांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना एक धनादेश दिला होता. करार रद्द करायचा असल्यास त्यांनी तो धनादेश बँकेत टाकून स्वतची रक्कम घ्यावी असे या दोघांनी सांगितले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना पाच महिने प्रत्येकी एक लाख रुपये दिले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल :नंतर त्यांनी व्याजाची रक्कम दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळत होते. त्यामुळे त्यांनी या दोघांनी धनादेश बँकेत टाकला होता. मात्र, खात्यात पैसे नसल्याने तो धनादेश परत आला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर इर्शाद, फहीम या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
हेही वाचा - Encounter Specialist Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात बदली