महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 30, 2020, 8:12 PM IST

ETV Bharat / state

वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांना विधान परिषदेवर नियुक्त करा : जनता दलाची मागणी

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागा भरताना वीज क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून प्रताप होगाडे यांच्या नावाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने केली आहे.

Pratap Hogade
प्रताप होगाडे

मुंबई - सरकारला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे म्हणून राज्यपालांच्या माध्यमातून विधान परिषदेत तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत असते. सध्या अशा १२ जागा रिक्त झालेल्या असून लवकरच त्या भरण्यात येणार आहेत. अलिकडच्या काळात राजकीय सोय लावण्यासाठी सर्वच पक्षांकडून या जागांचा वापर केला गेला असून त्यामुळे मूळ हेतू बाजूला पडला आहे.या पार्श्वभूमीवर, विद्यमान सरकारने या जागा भरताना राजकीय सोय लावण्याची भूमिका न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी राज्यपालांकडे शिफारस करावी आणि वीज क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून प्रताप होगाडे यांच्या नावाचा विचार करावा, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.

याबाबत पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून “महाआघाडी सरकारकडून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागा भरताना, विविध क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तींची शिफारस केली जाईल आणि राज्यपाल महोदयही अशाच व्यक्तींची विधान परिषदेवर निवड करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वीज क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या प्रताप होगाडे यांच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस केली आहे.

प्रताप होगाडे हे जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे विद्यमान प्रधान महासचिव असले तरी महाराष्ट्राला त्यांची खरी ओळख वीजतज्ज्ञ म्हणून आहे. होगाडे हे गेली चार दशके कामगार, शेतकरी, यंत्रमाग, उद्योग व संबंधित सामाजिक सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, गेली दोन दशके राज्यातील वीजेच्या प्रश्नावर काम करणारे तज्ज्ञ म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली आहे.या काळात वीज कंपन्यांच्या कारभाराबाबत सातत्याने आवाज उठविण्याचे काम करतानाच वीज नियामक आयोगासमोर शेतकरी, सर्वसामान्य वीज ग्राहक, उद्योजक व यंत्रमाग धारक यांची बाजू मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. परिणामी जनतेला किमान तीन हजार कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. अशा तज्ज्ञ व्यक्तीची विधान परिषदेवर निवड झाल्यास वीज कंपन्यांचा कारभार सुधारण्यासाठी तसेच विजेच्या संदर्भातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी उपयोग होऊ शकेल. तसेच त्यांची निवड ही राज्य सरकार व राज्यातील वीज ग्राहक या दोघांसाठीही उपयुक्त व सार्थ ठरेल, असे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी म्हटले आहे. पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पत्र लिहिले असून, विधान परिषदेवरील जागांची नियुक्ती करताना संबंधित व्यक्ती या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतील याची काळजी घेण्यात यावी आणि वीज क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून प्रताप होगाडे यांच्या नावाचा विचार व्हावा, असे नारकर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details