मुंबई - साहित्य क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांना यावर्षीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशनाची निवड केली आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देण्यासाठी आणि भाषा संवर्धनासाठी अनुक्रमे प्राध्यापक आर. विवेकानंद गोपाळ आणि अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व पुरस्कार 27 फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.
हेही वाचा -'कोरोना व्हायरस'ला COVID-19 नावं देण्यामागे काय आहे कारण?
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. राज्य शासनाकडून त्यांची जयंती (27 फेब्रुवारी) ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यभर मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व मंत्रालयीन विभाग आणि त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.
राज्य शासनाकडून विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत पुरस्कार, डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठीही 35 वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व पुरस्कारांच्या वितरणासाठी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.