मुंबई :न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने पुढे म्हटले की एकट्या आरोपीकडून अर्थात सचिन वाझेकडून हा सगळा कट रचला जाऊ शकत नाही. यात एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने जिलेटिनच्या कांड्या कोणासोबत ठेवण्याचा कट रचला होता. यावर एनआयएने मौन बाळगले आहे. इतरांच्या मदतीने कट रचल्याचे एनआयएने म्हटले होते. परंतु षडयंत्र रचणाऱ्या इतरांची नावे मात्र उघड केलेली नाहीत असे खंडपीठाने नमूद केले.
न्यायालयाने नोंदवले मत : स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याचे षडयंत्र रचणाऱ्या इतरांच्या संदर्भात एनआयएने तपास केलेला नसल्याचे आम्हाला प्रथमदर्शनी आढळून आलेले आहे. या संदर्भातील अनेक प्रश्नांवर एनआयए अनुत्तरीत आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात सचिन वाझे इतरांच्या मदतीशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय सहभागी असेल हे पूर्णतः अशक्य आहे. या प्रकरणात बरंच नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. म्हणजे संबंधिताने ऑबेरॉय हॉटेलमध्ये 100 दिवसांसाठी एक रुम बूक केली होती. हॉटेलमधील रुमच्या बुकिंगसाठी रोख पैसे दिले होते. बनावट आधार कार्ड दिले होते. हे सगळे एकट्याच कामच नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.
अहवाल मीडियाला लीक केला : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांना ठराविक रक्कम दिली होती, असे विधान सायबर तज्ज्ञाने केले होते. ज्याची न्यायालयानेही दखल घेतली. एनआयएने सायबर तज्ज्ञाचाही जबाब नोंदवला होता. ज्यामध्ये म्हटले होते की परमबीर सिंह यांनी त्याला अहवालात बदल करण्यास सांगितले आणि नंतर तो अहवाल मीडियाला लीक केला. एनआयएच्या तपासाबाबत खंडपीठाने म्हटले की साक्षीदाराला म्हणजे सायबर एक्स्पर्टला एवढी मोठी रक्कम का देण्यात आली? आयुक्तांना त्यामध्ये काय स्वारस्य होतं? याच्या उत्तरांबाबत हा ग्रे एरिया आहे याबाबत कोणतीही उत्तरे नाहीत असे मतही खंडपीठाने एनआयएच्या तपासाबाबत व्यक्त केले होते.