मुंबई - काळविटाची शिकार करून त्याची शिंगासह कातडी विकणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जॉन सुंदर इसमाला असे आरोपीचे नाव आहे. या कारवाई दरम्यान 3 लाख रुपये किमतीचे काळविटाचे कातडे जप्त करण्यात आले आहे.
काळविटाची कातडी विकणारा अटकेत, गुन्हे शाखा 7 ची कारवाई
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 7 च्या अधिकाऱ्यांनी घाटकोपर बस डेपोजवळ कारवाई करत एका व्यक्तीजवळून 3 लाख रुपये किमतीचे काळविटाचे कातडे जप्त केले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 7 च्या अधिकाऱ्यांना घाटकोपर बस डेपोजवळ एक व्यक्ती काळवीटचे कातडे विक्रीस घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस पथकाने या भागात सापळा रचला. या वेळी काळी बॅग घेऊन संशयित व्यक्ती आली. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये काळविटाची शिंगे असलेले कातडे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. त्याने हे कातडे त्याने कुठून मिळविले, या काळविटाची शिकार कुठे, कोणी केली या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
काळवीट हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. काळवीट या वन्य प्राण्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अवैध तस्करी केली जाते. श्रीमंत लोक हे कातडे शोभेच्या वस्तू म्हणून वापरत असतात. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणत काळविटाची शिकार होण्याच्या घटना समोर येत असतात.