मुंबई - दिल्ली पोलिसांनी भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा घाट उधळून लावला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तपासादरम्यान महाराष्ट्र एटीएसने मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज गुरुवारी पहाटे आणखी एकाला वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (50) असे त्याचे नाव आहे. नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात त्याला चौकशीसाठी त्याला आणण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी डाव उधळला -
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १४ सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांमध्ये मुंबईचा रहिवासी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, दिल्लीच्या जामिया नगरातील रहिवासी ओसामा उर्फ सामी, यूपीतील रायबरेलीचा रहिवासी मुलचंद उर्फ साधू, तसेच प्रयागराजमधील जिशान कमर, बहराइचा रहिवासी मोहम्मद अबू बकर आणि लखनऊचा राहणारा मोहम्मद आमिर जावेद यांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असताना जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याला रेल्वेचे तिकीट देणाऱ्या एजंटला एटीएसने ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते.