मुंबई - शिखर बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये बंद पाळण्यात आला. याची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खिल्ली उडवली आहे. 'हा तर चोर तो चोर वर शिरजोर' असा प्रकार आहे. ठेवा तुमची बारामती कायमची बंद! कोणाला काय फरक पडतो,' असं खोचक ट्विट दमानिया यांनी केलं आहे.
'चोर तो चोर वर शिरजोर', बारामती बंदवरुन दमानियांचा पवारांना टोला
शिखर बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये बंद पाळण्यात आला. याची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खिल्ली उडवली.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी 2010 साली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बँकेच्या संचालक मंडळावर 5 दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ईडीने काल ७० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
काय आहे प्रकरण
राज्य सहकारी बँकेने 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले होते. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. ही सर्व कर्जे बुडीत निघाली होती. ही कर्जे देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत सुरिंदर अरोरा यांनी 2010 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जवळपास 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अरोरांनी केला आहे.