मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या वांद्रे पूर्वेकडील कार्यालयाचे पाडकाम केले. हे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया याठिकाणी पाहणी करणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमैया यांनी या ठिकाणी येऊन दाखवावे. शिवसैनिक त्यांचा योग्य तो पाहुणचार करतील, असे थेट आव्हान दिले आहे. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडा प्राधिकरणाच्या कार्यालयात धडकले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे म्हाडाचा परिसर दणाणून गेला आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडण्याची मागणी केली. सीईओ बोरीकर यांनी परब यांची मागणी मान्य करत वादावर पडदा टाकला.
किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात - म्हाडाने हे बांधकाम माझे नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझी बदनामी केल्याबद्दल आम्ही आधीच किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार आहेत. ते बांधकाम हाऊसिंग सोसायटीने केले होते आणि मी आमदार म्हणून ते कार्यालय वापरत होतो. ते नियमित करता येत नसल्याचे आढळून आल्यानंतर सोसायटीने स्वतःहून ते बांधकाम पाडले असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.
तोपर्यंत मागे हटणार नाही : पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस दलाचा वापर केल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदार राहणार नाही, असे सांगितले. पोलिसांनी सामंजस्यांने शिवसैनिकांची मनधरणी करत म्हाडा प्राधिकरणाच्या आवाराच्या बाहेर काढले. परब यांनी म्हाडा प्राधिकरणाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांची भेट घेत, म्हाडाच्या वसाहतीत असलेले जनसंपर्क कार्यालय माझ्याशी संबंधित आहे का, असा जाब विचारला. त्यावर बोरीकर यांनी नकार दिला. या घटनेमुळे परब यांनी बोरीकरांना चांगलेच फैलावर घेतले. मला नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने समोर आणा, माझी बदमानी करण्यात आली आहे. जोपर्यंत त्याला समोर आणणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका परब यांनी घेतली.