मुंबई-एका खासगी वृत्तवाहिनीचे पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू ही दुःखद घटना आहे. आरोग्य यंत्रणा सुसज्ज व्हायला पाहिजे, या मताचा मी देखील आहे. या प्रकरणी आरोग्य यंत्रणेत काही त्रुटी असल्यास त्याचा योग्य तपास करुन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
पांडुरंग रायकर यांना कोरोना संसर्ग झाला होता. वेळेवर ऑक्सिजन पुरवणारी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रायकर यांचा मृत्यू झाला. यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, टीका करणे हे त्यांचे काम आहे, असे अनिल परब यांनी म्हटले.
हेही वाचा-पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात घरी बसून राहिल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांकडून होत आहे. याबाबत बोलताना अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बैठका कोठे घेतल्या?, असा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांना विचारला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी बसून अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. तेथे मंत्री व इतर चर्चा,वेबिनार घेत आहेत, असे प्रत्युत्तर परब यांनी विरोधकांना दिले.
विदर्भात आलेल्या पुरावर कोणीही राजकारण करू नये. महाविकास आघाडीचे सर्व मंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मैदानात उतरुन ते काम करत असल्याचे परब यांनी सांगितले.