मुंबई -केंद्र सरकारकडून मागणीपेक्षा कमी रेल्वे गाड्या येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर चिडून रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालय खेळतंय रडीचा डाव - अनिल परब - अनिल परब पियुष गोयल टीका
कामगारांची दिशाभूल होईल अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल मुद्दाम देत आहेत. रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
1 मे ते 24 मे या कालावधीत 575 गाड्यांमधून 7 लाख 76 हजार मजूर आपापल्या राज्यात पाठवण्यात आले असल्याची माहिती परब यांनी दिली. 26 मे ला 175 गाड्यांची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. रात्री अडीच वाजता अचानक 145 गाड्यांचे शेड्यूल पाठवण्यात आले. पश्चिम बंगालसाठी 45 गाड्या मागवल्या असताना अचानक 43 गाड्यांचे शेड्यूल तयार करण्यात आले. पश्चिम बंगालमधील वादळामुळे तिथे गाड्या सोडता येणार नाही, अशी विनंती पश्चिम बंगालच्या सरकारने केली असतानाही तेथे जाण्यासाठी 43 गाड्यांचे आज नियोजन केले गेले.
रेल्वे मंत्री पियुष गोयल मुद्दाम असे नियोजन करत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या रहिवाशांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सरकारच्यावतीने मंत्री अनिल परब यांनी केले.