मुंबई -अधिवेशन टाळण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बागुलबुवा दाखवला जात आहे, अशी टीका मनसेने काल केली होती. शिवसेनेकडून अनिल परब यांनी यावर प्रत्युत्तर देत, स्टेडियम बाहेरच्यांनी खेळायला शिकवू नये, अशा मनसेला जोरदार टोला लगावला आहे. तसेच, एकमेव आमदार असलेली मनसे अधिवेशनाला गैरहजर राहिली तरी त्यांची हजेरी लावण्याची जबाबदारी मी घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, मनसे आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध जुंपण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -....तर मुंबईत रात्रीची संचारबंदी लावली जाऊ शकते - पालिका प्रशासनाचे संकेत
पळ काढण्यासाठी कोरोनाची भीती
राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत पाच मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसागणिक वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यासह मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिसुत्रीचे पालन करा, अन्यथा येत्या आठ दिवसांत लॉकडाऊन करावे लागले, असा इशारा दिला आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला लक्ष्य केले. अधिवेशनातून पळ काढण्यासाठी कोरोनाची भीती दाखवली जात असल्याचा आरोप केला.
स्टेडियम बाहेरच्यांनी खेळायला शिकवू नये - परिवहन मंत्री
परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून मनसेचा खरपूस समाचार घेतला. मनसेला अधिवेशनावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचा एकच आमदार आहे. अधिवेशनाला त्यांना गैरहजर राहण्याची परवानगी देतो. तसेच, मुख्यमंत्र्यांशी बोलून हजेरी लावण्याचीही जबाबदारी घेईन, असेही परब म्हणाले. ज्यांचे सदस्य आहेत, त्यांनी अधिवेशनावर बोलावे. स्टेडियम बाहेरच्यांनी खेळायला शिकवू नये, असा परब यांनी मनसेला चिमटा काढला.