मुंबई-एसटी बसेस योग्यरितीने सॅनिटाईज करून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यामुळे कृपया, श्रमिक- मजुरांनी अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.
श्रमिकांनी एसटी बसमधूनच सुरक्षित प्रवास करावा;अनिल परब यांचे आवाहन
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेल्या पाच दिवसात 72 हजार 956 श्रमिक-मजुरांना सुरक्षितपणे एसटी बसेस द्वारे राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता, राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे अशा अवैध व धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई होऊ शकते, असे अनिल परब म्हणाले आहेत. एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. एसटी व राज्य परिवहन विभागाने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातत्याने आपल्या गावी निघालेल्या श्रमिक-मजुरांचा शोध घेत आहोत. श्रमिकांना गावी परतण्यासाठी तातडीने एसटी बसेस उपलब्ध करून देत आहोत, असे ते म्हणाले.
गुरुवारी तब्बल 1200 बसद्वारे 27 हजार 528 मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 दिवसांत राज्यातील 72 हजार 956 श्रमिक-मजुरांना या सुरक्षित प्रवासी वाहतूकीचा लाभ झाला आहे, असेही परब यांनी सांगितले.