मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. शुक्रवारी (25 जून) अनिल देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतल्या निवासस्थानी व कार्यालयात ईडीकडून धाडसत्र सुरू होतं. त्यांच्या वरळीतल्या निवासस्थानी तब्बल 11 तास धाडसत्र सुरू होतं. यावेळी स्वतः देशमुखही हजर होते. दरम्यान, काल रात्री उशिरा अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही ईडीने अटक केली. या दोघांना न्यायालयात सादर करण्यात आलं. दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता देशमुखांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीइकडून 29 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची समन्स बजावण्यात आली आहे. आज (26 जून) ते ईडीपुढे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले होते. तसेच हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.
'दोघांनी बार मालकांकडून उकळले पैसे'
ईडीनं शनिवारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना न्यायालयात सादर केलं. हे दोघेही अनिल देशमुखांचे खासजी सचिव आणि खासगी स्वीय सहाय्यक आहेत. 'या दोघांनी बार मालकांकडून पैसे उकळले आहेत. ज्या बार मालकांकडून पैसे घेण्यात आले होते, त्या बार मालकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. हे उकळलेले पैसे या दोघांनी सचिन वाझेला दिले. याबाबतचा सचिन वाझेचा तळोजा कारागृहात जबाबही नोंदवण्यात आला आहे', असे ईडीच्या वकिलाने न्यायालयात म्हटले.
'सचिन वाझेने मुंबईतून जवळपास सव्वातीन कोटी वसूल केले'
सचिन वाझेनं मुंबईतील झोन 1 ते 7 मधून जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 1 कोटी 64 लाख रुपयांची वसूली बारमधून केली. तर झोन 8 ते 12 मधून 2 कोटी 66 लाख रुपयांची वसुली केली. ही वसुली बार मालकांना एक्ट्रा परवानगी मिळण्यासाठी केली जात होती. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या नावे नागपुरात साई संस्था ट्रस्ट नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या बॉडीवर कुंदन शिंदे आहे. तसंच दिल्लीसह अनेक ठिकाणच्या कंपन्यामध्ये कुंदन मोठ्या पदावर आहे. कुंदन शिंदे हा अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पैसे जमा करायचा. तर पालांडे पोलीस बदल्यांचे पैसे जमा करायचा. यातील पैशांचा व्यवहार कुठे झाला? कसा झाला? पैसे कुठे गुंतवण्यात आले? यांचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. या सगळ्यात आजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे', असे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले.