मुंबई -अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचे वरळीतील घर तसेच त्यांचा मुलगा सलील देशमुख यांनी 2006मध्ये उरण येथे घेतलेली जमीन आदींचा समावेश आहे. दरम्यान, आज अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख? -
माझी आणि माझ्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती तात्पुरत्या स्वरूपात ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सलील देशमुख यांनी 2006मध्ये घेतलेल्या उरण इथल्या जमिनीचादेखील समावेश आहे. 2006मध्ये ही जमीन 2 कोटी 67 लाख रुपयांना सलील देशमुख यांच्या कंपनीने विकत घेतली होती. या जमिनीचा भाव काही प्रसारमाध्यमे 300 कोटी दाखवून एक संभ्रम निर्माण करत आहे. तसेच मला ईडीचा समन्स आला होता. या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा जो काही निकाल येईल, त्यानुसार ईडीच्या चौकशीला सामोरे जाईल, असे अनिल देशमुख यांनी व्हिडीओत म्हटले आहे.