मुंबई -काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण-कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल गृहमंत्री देशमुख यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की, त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला.