मुंबई- अनिल देशमुख ईडीच्या चौकशी फेऱ्यात आहेत. त्यांना ईडीकडून दोन वेळा समन्सही बजावला आहे. शनिवारी (दि. 3 जुलै) सकाळी त्यांना तिसरा समन्स बजावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, देशमुखांना तिसरे समन्स अद्याप मिळाले नाही. हे समन्स अद्यापही प्राप्त झाले नसल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील अॅड. इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे.
शनिवारी (दि. 3 जुलै) सकाळी अनिल देशमुख दिल्लीला गेले असल्याची माहितीही प्रसिद्ध झाली होती. मात्र, देशमुख दिल्लीत गेले नाहीत मी त्यांना सकाळी भेटलो आहे, अशी माहितीही इंद्रपाल सिंग यांनी दिली. दरम्यान, ऋषीकेश देशमुख हे अनिल देशमुख यांचे पुत्र असून त्यांना ईडीकडून आतापर्यंत एक समन्स आल्याची माहिती इंद्रपाल सिंग यांनी दिली.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोप -
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंह यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपयाच्या वसूलीचे टार्गेट दिले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले होते.
हेही वाचा -Raju sapate suicide - कलाक्षेत्रातील कोणाला त्रास दिला तर हातपाय तोडू; मनसेचा इशारा