मुंबई- दिल्ली येथील तबलिगी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी नागरिक देशभर आपआपल्या गावी परतले होते. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने संपूर्ण देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. मात्र, दिल्लीसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होता होता वाचली आहे. दिल्लीसारखाच तबलिगी हा धार्मिक कार्यक्रम वसई येथे होणार होता. गृह विभागाने वेळीच सतर्कता बाळगून परवानगी नाकारल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई ( पश्चिम) येथील दिवानमान या गावालगतच्या परिसरात तबलिगी इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमास परवानगीची मागणी करण्यात आली होती. शमीम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीने गृह विभागास रितसर पत्र देऊन परवानगी मागितली होती. १४ आणि १५ मार्चलाा वसई येथे हा धार्मिक कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमास साधारणपणे ५० हजार भाविक जमणार असल्याचे स्थानिक पोलीस प्रशासनाला संबंधित आयोजक संस्थेच्यावतीने कळविण्यात आले होते.