मुंबई -लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने शुल्क घेऊ नये, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू असूनही अनेक शाळांकडून संपूर्ण शुल्क वसूल करण्यात येत होते. त्यावर पालकांनी 40 टक्के फी भरण्याची तयारी दाखवली. मात्र, सवलती सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून संतप्त पालकांनी आज (३० जानेवारी) शिवसेना भवनावर मोर्चा काढला.
हेही वाचा -मुंबईतील नरीमन हाऊस व रेल्वेस्थानकांवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ
ठोस भूमिका नाही
लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळांनी शिकवणी शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क पालकांकडून वसूल केले. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात, तसेच परीक्षेलाही बसू दिले नाही. शुल्कासंदर्भातील प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत शिक्षण विभाग, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळेच, या विरोधात आज पालकांनी मोर्चा काढला, अशी माहिती इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष अनुभा सहाय यांनी दिली.
पालक शिवसेना भवनावर
शैक्षणिक वर्ष संपायला २ ते ३ महिने उरले असताना अनेक शाळा संपूर्ण वर्षाचे शुल्क मागत असल्याने पालक संघटनांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केली. शुल्कवाढ केलेल्या शाळांची यादी शालेय शिक्षण विभागाला दिली. तरीही सरकारने कार्यवाही केली नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना आज पालक भेट घेण्यास गेले, मात्र भेट न मिळाल्याने समस्या मांडण्यासाठी आम्ही शिवसेनाभवनवर आलो असल्याचे पालकांनी सांगितले. यावर शिवसेना भवनवर स्टेट मायनॉरिटी कमिशनचे अध्यक्ष जे.एम अभ्यंकर यांनी याप्रकरणी एक बैठक बसवू, असे आश्वासन पालकांना दिले.
हेही वाचा -'या' वेळेत लोकल प्रवास केल्यास होणार कारवाई