ETV Bharat / state
Andheri Double Murder Case : माजी सैनिकानं केला पत्नीसह मुलीचा खून, वाचा न्यायालयानं तरीही का दिला जामीन
( Andheri Double Murder Case ) आजारी असलेल्या पत्नीसह मतिमंद मुलीचा माजी सैनिकानं खून केल्यानं अंधेरीत मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी 91 वर्षीय माजी सैनिक असलेल्या आरोपी पुरुषोत्तम सिंग गंधक याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
संग्रहित छायाचित्र
मुंबई : आजारी पत्नी आणि मानसिक दिव्यांग मुलीचं आजारपण पाहू न शकल्यानं माजी सैनिकानं दोघींचा खून ( Andheri Double Murder Case ) केल्यानं अंधेरीत मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या माजी सैनिकाला हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. पुरुषोत्तम सिंग गंधक असं त्या खुनी माजी सैनिकाचं नाव आहे. तर जसबीर सिंग (८१) असं पत्नीचं आणि कमलजित (५५) असं खून करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. पुरुषोत्तम सिंग यांची पत्नी गेल्या अनेक वर्षापासून अंथरुणावर खिळून होत्या. तर गतीमंद मुलगी 55 वर्षाची होती. ती सुद्धा आजारी असल्यानं तिची सगळी कामं पुरुषोत्तम सिंग यांनाच करावी लागत होती. विशेष म्हणजे पुरुषोत्तम सिंग भारत पाकिस्तानच्या युद्धात अंगावर गोळ्या झेललेले लढवय्यै सैनिक आहेत.
का मिळाला पुरुषोत्तम सिंग यांना जामीन : आरोपी पुरुषोत्तम सिंग यांना 11 फेब्रुवारी 2022 मध्ये घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी अटक केली होती. माजी सैनिक असलेल्या पुरुषोत्तम सिंग याचं वय 91 वर्ष आहे. त्यासह त्यांनी भारत पाकिस्तान युद्धात अंगावर गोळ्या झेलल्या आहेत. कायदेशीरदृष्ट्या खुनी असलेल्या पुरुषोत्तम सिंग यांनी तब्बल 55 वर्षे आजारी पत्नी आणि गतीमंद मुलीची सेवा केली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टानं आरोपी पुरुषोत्तम सिंग यांना जामीन मंजूर केला. खटला यापुढं सुरू होणं शक्य नाही. त्यामुळेच न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी पुरुषोत्तम सिंग यांना जामीन मंजूर केला.
25 वर्ष केली सेवा, मग पत्नी, मुलीचा केला खून : आजारी पत्नी आणि मतिमंद मुलीचा माजी सैनिकानं खून केल्याची घटना 6 फेब्रुवारी 2022 च्या रात्री घडली होती. आरोपी पुरुषोत्तम सिंग यांची पत्नी गेल्या 15 वर्षापासून अंथरुणाला खिळलेली होती. तर मुलीला जन्मतःच 'ऑटिझम स्पेक्ट्रम' हा आजार होता. 55 वर्षाची गतीमंद मुलगी आजारी असल्यानं त्यांनाच तिचं सगळं करावं लागत होतं. मात्र आपण यापुढं त्यांचं दु:ख पाहू शकत नसल्याचं सांगत त्यांनी पत्नी जसबीर आणि गतीमंद मुलगी कमलजित यांचा खून केला. या घटनेची माहिती आरोपी पुरुषोत्तम सिंग यांनी फोन करुन बाजूला राहणाऱ्या आपल्या दुसऱ्या मुलीला दिली होती.
अंधेरी न्यायालयानं सुनावली कोठडी :आपल्या पत्नी आणि मुलीचा खून ( Andheri Double Murder Case ) केल्याची माहिती गुरबिंदर कौर या दुसऱ्या मुलीला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पुरुषोत्तम सिंग गंधक यांच्या घरात धाव घेतली असता, जसबीर आणि मुलगी कमलजित यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम सिंग यांना अटक केली. अंधेरी न्यायालयानं 11 फेब्रुवारी 2022 ला आरोपी पुरुषोत्तम सिंग यांना कोठडी सुनावली होती.
आरोपी माजी सैनिकाला विविध आजार : आपल्या पत्नी आणि 55 वर्षीय गतीमंद मुलीचा खून करणाऱ्या वडिलांना भेटायला गुरबिंदर कौर ही मुलगी कारागृहात गेली. त्यावेळी त्यांना विविध आजारानं ग्रासल्याचं तिनं सांगितलं. आरोपी पुरुषोत्तम सिंग यांना गुडघेदुखी, वारंवार लघवी होणं, अशा आजारानं ग्रासल्याची माहिती गुरबिंदर कौरनं दिली. तरीही आरोपी पुरुषोत्तम सिंग त्यांच्या पत्नी आणि मुलीची सेवा करत होते. त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
भारत पाकिस्तान युद्धात अंगावर झेलल्या गोळ्या :आजारी पत्नी आणि मुलीचा खून करणारे पुरुषोत्तम सिंग गंधक हे माजी सैनिक आहेत. त्यांनी भारत चीन आणि भारत पाकिस्तान युद्धात अंगावर गोळ्या झेलल्या आहेत, अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यांच्या अंगावर अद्यापही गोळ्यांच्या खुणा असून ते आजारी असल्याचंही वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. आरोपी पुरुषोत्तम सिंग गंधक हे 91 वर्षीय असून शेवटच्या क्षणी कारागृहात मरु नये, अशी त्यांची इच्छा आहे, असंही त्यांच्या वकिलानं उच्च न्यायालयात सांगितलं. त्यामुळे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी पुरुषोत्तम सिंग गंधक यांना जामीन मंजूर केला. आरोपी गंधक हे एक वर्ष सहा महिने कोठडीत होते. त्यामुळे आता खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच जामीन मिळू शकतो, असंही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Last Updated : Aug 31, 2023, 4:27 PM IST