मुंबई ANC Seized Drugs : मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं (ANC) दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 4.90 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटनं शाहरुख शमसुद्दीन शेख (26) याला 4 किलो 740 ग्रॅम हायड्रोवीड आणि 74 ग्रॅम एमडीसह अटक केलं आहे. एएनसीनं शेखला धारावीतून अटकही केलं आहे.
सापळा रचून आरोपीला घेतलं ताब्यात : अमली पदार्थ विरोधी पथकाचे घाटकोपर प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांना एक तस्कर धारावी इथं ड्रग्जचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकानं तिथं सापळा रचला होता. अमली पदार्थ विरोधी पथकानं धारावीमध्ये आरोपीची वाट पाहत असताना एक संशयास्पद व्यक्ती अमली पदार्थ विरोधी पथकाला दिसली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून 500 ग्रॅम हायड्रोविड सापडलं. यानंतर त्याची चौकशी करुन अमली विरोधी पथकानं पुढील तपास केल्यानंतर त्याच्या घरातून 4 किलो 240 ग्रॅम एमडी ड्रग्जही जप्त केलं आहे. तसंच अमली पदार्थ विरोधी पथकानं शेखकडून इलेक्ट्रॉनिक वजनाचं यंत्रही जप्त केलंय.
अमली पदार्थ विरोधी पथकानं शेखकडून 4.75 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा परळचा रहिवासी आहे. या प्रकरणात शेखसह आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास सुरू आहे. - पोलीस उपायुक्त जाधव