मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिल येथे उभे राहावे म्हणून आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात इंदू मिलचा ताबा घेतला होता. त्यानंतर इंदू मिलमध्ये स्मारक करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. आज महापरिनिर्वाण दिनी आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिलच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Anandraj Ambedkar : इंदू मिलमधील स्मारकातील सुधारणाकडे सरकारचे दुर्लक्ष, आनंदराज आंबेडकर यांचा आंदोलनाचा इशारा - Anandraj Ambedkars warning of agitation
इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. या स्मारकाबाबत आणि पुतळ्याबाबत काही सुधारणा सांगितल्या होत्या. मात्र त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे आता सरकारच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्याची वेळ आली आहे असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दिला आहे.
पुतळ्याकडे दुर्लक्ष :यावेळी बोलताना, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इंदू मिलमधील कामाची पाहणी केली. त्यावेळी इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यात दुरुस्ती आणि काही त्रुटी आहेत. जो डमी पुतळा बनण्यात आला आहे, तो बाबासाहेबांच्या चेहऱ्यासारखा दिसत नाही. यात हाताची ठेवण वेगळी आहे. बाबासाहेबांचा सर्वात सुंदर पुतळा मुंबईतील मंत्रालयासमोर आहे. या सारखाच पुतळा व्हायला हवा. सध्याचा बाबासाहेबांचा डमी पुतळा फायनल करू नये. जर हाच पुतळा उभा राहिला गेला तर त्याला विरोध होईल, असा इशारा आधीच दिला होता. त्यानंतरही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
आंदोलनाशिवाय पर्याय नाही :इंदू मिल येथील स्मारकात एक भव्य ऑडिटोरियम असावे अशी सूचना केली होती. कमीत कमी अडीच हजार खुर्च्या असाव्यात अशी आमची मागणी आहे. मात्र सरकार केवळ एक हजार क्षमतेचे ऑडीटोरियम तयार करत आहे. आमच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. यामुळे लवकरच आता आम्हाला सरकारच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जर सरकार ऐकणार नसेल तर आम्हाला आता आंदोलना शिवाय पर्याय उरलेला नाही असा इशारा आनंदराज यांनी दिला आहे.