मुंबई- राज्यात सत्तेचा खेळ सुरू आहे. सत्तेसाठी राज्यातील नागरिक आणि मतदारांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी राज्यपालांना केले आहे.
हेही वाचा - 'फिक्सिंग' झाले तरी सत्यमेव जयतेचाच विजय; 'सामना'तून भाजपवर निशाणा
राज्यात भाजप आणि अजित पवार तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनवत आहेत. हे सर्व सत्तेसाठी चाललेले खेळ आहेत. हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. शिवसेना ही महात्मा गांधी यांना मारणाऱ्या गोडसे यांना पाठिंबा देणारी तर काँग्रेस महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. असे दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येणार असतील तर तत्त्वाला तिलांजली देऊन सत्तेसाठी चाललेले राजकारण आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.