मुंबई Anandacha Shidha:राज्य सरकारच्या वतीनं राज्यातील सर्वसामान्य जनतेला सणासुदीच्या काळात अत्यल्प दरात पाच जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय 'आनंदाचा शिधा' या योजनेअंतर्गत सरकारनं घेतला आहे. (Department of Food and Civil Supplies) यापूर्वी राज्य सरकारच्या वतीनं गणेशोत्सव, पाडवा आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जनतेला हा 'आनंदाचा शिधा' शिधापत्रिकेवर उपलब्ध करून दिला होता; मात्र सणासाठी पाठवण्यात येणारा हा शिधा जनतेपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याचं आतापर्यंतचं चित्र आहे. त्याचप्रमाणे आताही दिवाळीसाठी पाठवण्यात आलेला 'आनंदाचा शिधा' अद्याप 55% शिधापत्रिका धारकांपर्यंत पोहोचला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे सण आणि उत्सवांच्या काळामध्ये जनतेला शंभर रुपयात 'आनंदाचा शिधा' दिला जातो; मात्र हा शिधा जनतेपर्यंत वेळेत पोहोचत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. (Food Distribution on Ration Card)
किती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला शिधा?राज्यातील अकरा कोटी पन्नास लाख जनतेसाठी 54946 रास्त भाव दुकानं कार्यरत आहेत. राज्यात एकूण 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी 1 कोटी 58 लाख शिधापत्रिका धारकांना या 'आनंदाचा शिधा' योजनेचा लाभ देण्यात येतो; मात्र आतापर्यंत राज्यातील 50 लाख 45000 शिधापत्रिका धारकांपर्यंत 'आनंदाचा शिधा' पोहोचला असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी महेश जाधव यांनी दिली आहे. शासनाने दिलेल्या या माहितीनुसार आतापर्यंत केवळ 30 टक्के शिधापत्रिका धारकांपर्यंतच 'आनंदाचा शिधा' दिवाळी सुरू झाल्यानंतर पोहोचला आहे.